भारत देशाची प्रचिती जगात संस्कृती, विविधता आणि परंपरा जपणारा देश म्हणून आहे. भारतात सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. यातील सर्वात प्रिय आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण म्हणजे ‘दिवाळी’ होय.
तर, आता आपण या लेखात दिवाळी सणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि तुम्हाला दिवाळी म्हणजे काय इन मराठी? प्रश्नाचे उत्तर मिळेल.
दिवाळी सणाची संपूर्ण माहिती (Diwali Mahiti in Marathi)
पावसाळा संपून पिकांची कापणी झाल्यानंतर शेतकरी राजा मनाजोगे पीक झाले हे समाधान व आनंद मनात ठेवून दिवाळी सण हर्षोल्लासात साजरा करतो.
दिवाळी या सणाला ‘दिपावली’ असे सुद्धा म्हणतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की ‘दिवाळी का म्हणतात?’ तर अंध:काराचा नाश करून तेजस्वी प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा उत्सव म्हणून दिवाळी असे म्हणतात.
आश्विन महिन्याच्या शेवटी व कार्तिक महिन्याच्या सुरवातीला येणारा दिवाळी हा मुख्य सण. शरद ऋतूच्या गुलाबी थंडीत येणाऱ्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात असलेला या सणाला कुटुंबातील प्रत्येकाची लगबग सुरू असते.
लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळे आनंदाने सहभागी होतात. जेव्हा प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवास संपवून रावणाचा वध केल्यानंतर सुखरूप अयोध्या नगरीत पोहचले होते म्हणून तेव्हा लोकांनी रांगोळी काढून, दिव्यांची रोषणाई करून त्यांचे स्वागत केले होते म्हणून आपण दिवाळी साजरी करतो.
अशा अनेक पौराणिक कथा दिपावली सणाशी निगडित आहेत.
दिवाळी 2023
दिनांक | दिवस | सण | महत्व |
गुरुवार ०९ नोव्हेंबर २०२३ | एकादशी आश्विन कृष्ण ११ | वसुबारस, गोवस्त द्वादशी | गायी वासरांचे पूजन |
शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३ | द्वादशी आश्विन कृष्ण १२ | धनत्रयोदशी, यमदीपदान, धन्वंतरी जयंती, गुरू द्वादशी | धन (पैसे) पूजन |
रविवार १२ नोव्हेंबर २०२३ | चतुर्दशी आश्विन कृष्ण १४ | नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन | अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ), लक्ष्मी मातेचे पूजन |
सोमवार १४ नोव्हेंबर २०२३ | आश्विन अमावस्या | दिपावली पाडवा, बलिप्रतिपदा, द्युत प्रतिपदा | अभ्यंगस्नान (दुसरी अंघोळ), साडेतीन मुहूर्तांपैकी एक |
मंगळवार १५ नोव्हेंबर २०२३ | कार्तिक शुक्ल १ | दिवाळी भाऊबीज, यमद्वितीया | बहिणी भावाला ओवाळते |
दिवाळीच्या सणातील दिवसांचे महत्व
1. वसुबारस
वसुबारस म्हणजेच वसु अर्थात द्रव्य आणि बारस म्हणजेच द्वादशी होय. हा दिवाळीतील पहिला दिवस आहे. या सणाला ‘गोवत्स द्वादशी’ म्हणून ही ओळखतात.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे खास करून शेतकरीवर्ग वसुबारसेला अधिक महत्व आहे. या दिवशी संध्याकाळी सुवासिनी महिला दाराबाहेर रांगोळी काढतात व अंगणात दिवे पणत्या लावतात.
नंतर तेहतीस कोटी देवता वास करणाऱ्या गायीची व तिच्या वासराची पुजा करतात व गायीची कृतज्ञता व्यक्त करतात. गायीच्या पायावर पाणी घालुन, हळदी कुंकू लावून तिची पूजा केली जाते व फुलमाळ घालून पूजन करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात.
तसेच गायीला आपल्या परिवाराची सुखशांती व आरोग्यासाठी मनोकामना करतात. या दिवसापासून दररोज महिलातर्फे रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रिया या दिवसी उपवास ठेवतात.
2. धनत्रयोदशी
धन म्हणजे पैशाचे पूजन करण्याचा हा पवित्र दिवस म्हणून धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे कारण दिवाळीच्या या दिवशी खरेदी करणे भाग्याचे समजले जाते.
दिवाळीच्या सुरवातीला येणार्या दिवसात हा एक दिवस आहे. आपण कमावलेल्या पैशांची आणि धनदौलतेची पुजा या दिवशी केली जाते.
धनधान्याची माता लक्ष्मी सोबत ज्ञानरूपी सरस्वती मातेचे सुद्धा पूजन याच दिवशी केले जाते, म्हणूनच या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणले जाते. या दिवशी लोक नवनवीन वस्तू, सोने, चांदी व मौल्यवान वस्तू खरेदी करतात व त्या वस्तूंचे पूजन करतात.
काहीजण खाण्यातील ‘धने’ सुद्धा पूजतात. धनाची आणि आरोग्याची देवता मानले जाणाऱ्या धन्वंतरी देवीचे पूजन व अभिषेक केला जातो. देवीकडे सुख समृद्धी, आरोग्याची कामना केली जाते.
याच दिवशी सर्वजण दिवाळीच्या लगबगीला सुरवात करतात. या दिवसाची आख्यायिका अशी आहे की हा दिवस परोपकारी देवीचा जन्म दाखवितो, जी आपले कल्याण व रक्षण करते आणि आपल्याला सदृढ आरोग्य देते.
या पवित्र प्रसंगी तिची उपासना करून, जी समृद्धता आणि चैतन्याची देणगी दिली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
3. नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी या खास दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला व प्रजेची जुलमी व अन्यायकारी जाचापासून मुक्तता दिली. प्राचीन दंतकथेनुसार, राक्षस नरकासुराने तपचर्या करुन ब्रम्हदेवांना प्रसन्न करुन कोणीही आपला वध करु शकणार नाही असे वर प्राप्त केले होते.
त्याने पृथ्वीतलावर हाहाकार माजविला अनेक राजांशी युद्ध करून त्याने मत मागवला होता तसेच त्याने स्त्रियांना कैद करून ठेवले त्यानंतर श्री भगवान कृष्णांनी त्या सोळा हजार स्त्रियांची सुटका करून या महादानव नरकासुराचा वध केला.
हा दिवस स्मरून लोक पहाटेपासूनच दिवाळीचे फटाके फोडून आतषबाजीला सुरुवात करतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळी सणाची पहिली अंघोळ म्हणजेच अभ्यंगस्नान केले जाते, देवाची पूजा प्रार्थना करून, फटाके वाजवतात व गोड फराळ करतात.
4. लक्ष्मी पुजन
लक्ष्मी पुजन हा दिवस दिवाळी सणामधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि श्रीगणेशाची पूजा करतात.
तसेच या दिवशी व्यापारी व व्यावसायिक दुकानदार आपआपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. हिंदू धर्मामध्ये एक मान्यता आहे की, लक्ष्मी माता ही खुप चंचल असते आणि ती आपल्या घरी स्थिर राहून वास करावा, याकरिता लोक लक्ष्मीची पूजा करतात.
विशेष करुन या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी वापरणारी एक नवी केरसुणी खरेदी करतात. तिला लक्ष्मी असे मानतात. तिची हळद-कुंकु वाहून, झेंडूची फुले वाहून पुजा केली जाते.
तसेच पाटावर नोटा, दागिने व माता लक्ष्मीची आराधना केली जाते. पुजा झाल्यानंतर दुसर्या दिवसापासून तिचा वापर घरात करण्यास सुरुवात केली जाते. घराच्या दारे खिडक्या उघड्या ठेवून दाराबाहेर रांगोळी काढून व दिव्याची सजावट केली जाते.
देवीदेवतांची उपासना करून आमंत्रण दिले जाते व फटाके वाजवून आनंद साजरा केला जातो. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात.
5. बलिप्रतिपदा / पाडवा
हिंदू संस्कतीप्रमाणे साडेतीन मुर्हतातील एक असलेला मुहूर्त म्हणून दिवाळी पाडवा हा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात असो किंवा नवीन वस्तूच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. दिवाळी पाडव्याला गायी गुरांची पूजा करून त्यांना मिष्ठान्न खायला देतात.
याच दिवशी बलिप्रतिपदा साजरी करतात. शेतकरी राजा त्याच्या घराबाहेर रंगबेरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना केली जाते.
शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. तसेच व्यापारी व दुकानदार लोक दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्या आर्थिक नववर्षाची सुरवात मानून देवपूजा व व्यवसायात वापरणारे हिशोबपुस्तक पुजले जाते.
दुकानाबाहेर व घराच्या चौकटीला झेंडूच्या फुलांचे हार लावले जातात आणि गाड्या स्वच्छ धुवून पूजा करून हार लावला जातो.
6. भाऊबीज
बहीण भावाच्या अतूट नात्याचे आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा हा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’ आणि दिवाळीची सांगता याच दिवसाने होते. हिंदीत यालाच ‘भाईदूज’ म्हणतात.
या दिवशी बहीण भावाला अभ्यंगस्नान घालते, त्याचे औक्षण करते, त्यास गोड मिष्ठान्न भरवते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते नंतर भाऊ बहिणीस ओवळणीच्या ताटात ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.
विवाहित बहिणी भाऊबीज साजरी करण्यासाठी दिवाळी फराळ घेऊन माहेरी येतात व कुटुंबासमवेत भाऊबीज साजरी करतात. भाऊबीजच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.
याच दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व जागृत होतं असही म्हणतात. या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या हातचे पदार्थ खाल्ल्यामुळे भावाला चांगलाच लाभ होतो. हा दिवस भावा बहिणींच्या नात्यातील प्रेम व गोडवा वाढवतो.
दिवाळी कशी साजरी करतात
प्राचीन पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व असलेला हा दिव्यांचा उत्सव सांस्कृतिक, प्रादेशिक आणि धार्मिक सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्ती आनंदाने साजरा करतो.
दिवाळी सणाचे तेजस्वी वैभव आणि समृद्ध प्रतीकात्मकता याने केवळ भारतातच नाही तर जगभरातील भारतीय समुदायांमध्येही याला महत्त्वाची जागा मिळवून दिली आहे. इंग्लंड, अमेरिका, इंडोनेशिया, श्रीलंका, कॅनडा अशा अनेक देशात दिवाळी उत्साहात साजरी करतात.
दिवाळी आली म्हणले की मुलांना शाळेच्या सुट्ट्यांची ओढ लागलेली असते. शहरात असलेला नोकरदारवर्ग सुद्धा सुट्टीला गावी घरी जाण्याच्या तयारीत असतो. नंतर मुले दिवाळीत किल्ला बनवण्यासाठी माती आणि खेळणी गोळा करतात आणि सुरेख किल्ला बनवतात.
इकडे व्यापारी व दुकानदार दुकानांची साफसफाई करतात तर गृहिणींची दिवाळीच्या फराळाची लगबग चालू असते. घरात सर्वांना नवीन कपडे घेतले जातात.
मुलांना फटाके खरेदी करून देतात. घराची साफसफाई करून सजावट केली जाते व तोरण बांधले जाते. दाराबाहेर आकाशकंदील लावला जातो. विद्युत रोषणाई केली जाते.
दिवाळीच्या पहाटे सगळे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. महिला घराबाहेर सडा टाकून रंगबेरंगी रांगोळी काढतात व दिवे पणत्याच्या ओळीने लावतात.
सर्व देवाला नमस्कार करून प्रार्थना करतात. मुले नवीन कपडे परिधान करून थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतात व नंतर फटाके उडवतात. लोक एकमेकांना आलिंगन देऊन व तोंड गोड करून दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
सगळे एकत्र लाडू, करंजी, चकली, अनारसे व चिवडा असा दिवाळी फराळ करतात. दिवाळी पहाट कार्यक्रम सुध्दा लोक अनुभवतात. तसेच दिवाळी अंक वाचण्यासाठी प्रकाशित केले जातात. अशा प्रकारे लोक एकत्र येऊन उत्साहात दिपावली सण साजरा करतात.
Frequently Asked Questions (FAQ) On Diwali Mahiti in Marathi
२०२३ सालची दिवाळी सण हा १२ तारखेला असून सुरुवात ९ नोव्हेंबर पासून वसुबारसने तर शेवट १५ नोव्हेंबरला भाऊबीजने होईल.
दिवाळी किंवा दिपावली ही हिंदू धर्माचाच एक सण आहे परंतु भारतात सर्व धर्मीय एकत्र येऊन सुखात व आनंदाने सहभागी होऊन साजरा करतात.
दिवाळी सणातील पहिली अंघोळ म्हणजेच अभ्यंगस्नान हे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सूर्योदयापूर्वी करणे शुभ मानले जाते.
दिवाळी ही फक्त एक दिवस नसून ती पाच दिवस असते, त्यामधे प्रत्येक दिवसाला विशिष्ठ महत्त्व असते. ते या लेखात सविस्तर वाचू शकता.